प्रश्न क्र. २ अ) १२ वी बोर्ड परीक्षेत विचारलेली प्रश्न

प्रश्न २ अ) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून  ती स्पष्ट करा. (कोणतेही तीन)

१)  माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली. 

                        किंवा 

    सविताने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. (मार्च २०२२,जुलै २०२३)

उत्तर : संकल्पना : वैयक्तिक आर्थिक घटक

स्पष्टीकरण : अर्थव्यवस्थेतील एका विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास होय. उदा. विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक उत्पन्न इ.

२)  समीरने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. (जुलै २०२२)

उत्तर : संकल्पना : उत्पादन घटकांचे मोबदले

स्पष्टीकरण : जे घटक उत्पादन कार्यामध्ये वापरले जातात. त्यांना उत्पादन घटक म्हटले जाते. भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या चार उत्पादन घटकांच्या किंमती किंवा त्यांचे मोबदले म्हणजेच अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा होय. वरील उदा. वेतन व व्याज दिले आहे जे की

उत्पादन घटकांचे मोबदले आहेत.


३)   राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली.(मार्च २०२५)

उत्तर : संकल्पना : स्थूल अर्थशास्त्र

स्पष्टीकरण : स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वसाधारण पातळीवरील एकूण आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदा. एकूण

रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण मागणी,एकूण पुरवठा, सर्वसाधारण किंमत

पातळी इ. स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते.

४)  पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. (ऑक्टो.२०२१, मार्च २०२४, मार्च २०२५)

उत्तर : संकल्पना : उपयोगिता 

स्पष्टीकरण : वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. वरील उदाहरणात देखील पूजाने वही पेनचा

वापर करून आपली निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. 

५)  सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. (जुलै २०२२)

उत्तर : संकल्पना : काल उपयोगिता

स्पष्टीकरण : काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. वरील उदाहरणात सलमा

हिवाळ्यात स्वेटर खरेदी करत असल्याने त्यातून काल उपयोगिता ही संकल्पना स्पष्ट होते.

६)  कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली.(मार्च २०२४)

उत्तर : संकल्पना : अप्रत्यक्ष मागणी

स्पष्टीकरण : ज्या वस्तूंची मागणी उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी केली जाते, तेंव्हा अशा वस्तूंच्या मागणीला अप्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. ही मागणी उत्पादन घटकांची असते.

 उदा. कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते .

७)  गरीब व्यक्तीला कार हवी आहे. (मार्च २०२३)

उत्तर : संकल्पना : इच्छा

स्पष्टीकरण : व्यक्तीला एखादी वस्तू हवी हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. म्हणून वरील उदाहरणात देखील फक्त इच्छा व्यक्त झालेली स्पष्ट होते.

८)  अमरने आपली चहाची गरज भागविण्यासाठी दूध, साखर व  चहापूड यांची एकत्रित मागणी केली.(मार्च २०२५)

उत्तर : संकल्पना : पूरक मागणी

स्पष्टीकरण: जेंव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तू बरोबर केली जाते, तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात. पूरक

मागणीलाच संयुक्त मागणी असेही म्हणतात. एखादी गरज भागविण्यासाठी जेंव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वस्तूंची मागणी एकत्रित केली जाते. तेंव्हा पूरक मागणी अस्तित्वात येते.

उदा. शाईपेन आणि शाईची मागणी, कार आणि इंधनाची मागणी

९)  साखरेच्या किंमतीत ५० % ने घट झाल्यास साखरेच्या मागणीत ५० % ने वाढ होते. (ऑक्टो.२०२१)

उत्तर : संकल्पना : एकक लवचिक मागणी

स्पष्टीकरण : जेंव्हा किंमतीत ज्या प्रमाणात बदल होतो त्याच प्रमाणात मागणीत बदल घडून येतो त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात.

येथे किमतीतील बदल व मागणीतील बदल हे दोन्ही समान असतात. वरील उदाहरणात देखील किंमत व मागणी यांच्यातील बदल सारखे आहेत.

१०)   संकेतचे उत्पन्न ५०% नी वाढल्यामुळे आपला उपभोग्य वस्तूंच्या मागणीत २०% नी वाढ केली.(जुलै २०२२)

उत्तर : संकल्पना : उत्पन्न लवचिकता

स्पष्टीकरण : उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्ना व्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात.

वरील उदाहरणात देखील उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत बदल घडून येतो.

११)   मीठाच्या किंमतीमध्ये १०% नी वाढ झाली तरी रमेशने मिठाच्या मागणीत कोणताही बदल केला नाही.(जुलै २०२३)

उत्तर : संकल्पना : संपूर्ण अलवचिक मागणी

स्पष्टीकरण : किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्याला संपूर्ण अलवचीक मागणी असे म्हणतात. येथे मागणीची लवचिकता शून्य असते.

१२)   ४००० कि.ग्रॅ. तांदूळ उत्पादनापैकी शेतकऱ्याने रू. ४० दर असताना १००० कि.ग्रॅ. तांदूळ बाजारपेठेत विक्रीस आणला.(मार्च २०२२)

उत्तर : संकल्पना : पुरवठा

स्पष्टीकरण : विशिष्‍ट वेळी विशिष्‍ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्‍यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्‍यास पुरवठा असे म्‍हणतात.

१३)  एका टेबल विक्रेत्याने रू. २,००० प्रति टेबल याप्रमाणे १५  टेबलची विक्री केली त्यापासून त्याला रू. ३०,००० मिळाले.(मार्च २०२३)

उत्तर : संकल्पना : एकूण प्राप्ती

स्पष्टीकरण : वस्‍तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्‍थेला मिळणारी एकूण रक्‍कम म्‍हणजे एकूण प्राप्ती होय. हे उद्योगसंस्‍थेचे एकूण उत्‍पन्न होय.

वरील उदाहरणात देखील विक्रेत्याला त्याने विक्री केलेल्या टेबल पासून एकूण रू. ३०,००० प्राप्त झाले आहेत.

१४)  अभिजीतला १५ खुर्च्या विकल्यानंतर रू. ३००० मिळतात. प्रति खुर्ची त्याला रू. २०० ची प्राप्ती होते.(मार्च २०२५)

उत्तर : संकल्पना : सरासरी प्राप्ती

स्पष्टीकरण : प्रत्‍येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्‍कम म्‍हणजेच सरासरी प्राप्ती होय. वरील उदाहरणात देखील प्रति खुर्ची प्राप्त झालेली रक्कम दिली आहे. त्यावरून सरासरी प्राप्ती ही संकल्पना स्पष्ट होते.

१५)   जॉन त्याच्या मोबाईलच्या कारखान्यात पाच मोबाईलचे उत्पादन  पन्नास हजारात करतो. सहावा मोबाईल उत्पादित केल्यावर

 त्याला एकूण खर्च ५८ हजार रूपये येतो. (जुलै २०२२)

  उत्तर : संकल्पना : सीमांत खर्च 

स्पष्टीकरण : एका जादा नगसंख्येच्या उत्पादनानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च होय. वरील उदाहरणात

देखील एका जादा नगसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात वाढ झाली आहे.

१६)   भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत.(ऑक्टो.२०२१)

उत्तर : संकल्पना : मक्तेदारीयुक्त स्पर्धा

स्पष्टीकरण : मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा ज्यामध्ये अनेक विक्रेते जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. वरील उदाहरणात देखील अनेक कंपन्या आहेत.

१७)   रमेशने शेअर्सच्या किंमतीचा निर्देशांक तयार केला. (ऑक्टो.२०२१)

उत्तर : संकल्पना : विशिष्ट हेतू निर्देशांक

स्पष्टीकरण : विशिष्ट हेतू निर्देशांक म्हणजे एखादा उद्देश किंवा हेतू विचारात घेवून निर्देशांक काढणे होय. वरील उदाहरणात देखील शेअर्सचा हेतू विचारात घेवून किंमत निर्देशांक काढला आहे.

१८)  राजारामने २५ क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीत घेतले, त्यापैकी २ क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला काढला.

उत्तर : संकल्पना : स्व उपभोगासाठी उत्पादन

स्पष्टीकरण : स्वतःच्या कुटुंबाच्या गरजांसाठी एकूण उत्पादनापैकी विक्रीसाठी न वापरता बाजूला ठेवलेला भाग म्हणजे स्व उपभोगासाठीचे उत्पादन होय.

१९)   अनिताला दरमहा राज्य सरकारकडून पंधरा हजार रूपये निवृत्तीवेतन मिळते. (जुलै २०२२,२०२३ मार्च २०२४)

उत्तर : संकल्पना : हस्तांतरित उत्पन्न

स्पष्टीकरण : उत्पादन कार्यात प्रत्यक्ष सहभागी न होता. व्यक्तीला मिळणारे उत्पन्न म्हणजे हस्तांतरित उत्पन्न होय. उदा. निवृत्तीवेतन, बेकारी भत्ता इ.

२०)   शोभाने देशातील सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यासंबंधी माहिती गोळा केली.  (मार्च २०२२)

  उत्तर : संकल्पना : उत्पादन पद्धत  

  स्पष्टीकरण : एका वर्षाच्या काळात देशात उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मुल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे उत्पादन पद्धतीने केलेले मापन होय.

२१)   ल्यूसीने एक वर्ष कालावधीसाठी रू. १ लाख बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक रकमी भरणा केला.  (मार्च २०२२,जुलै २०२३)

  उत्तर : संकल्पना : मुदत ठेवी

  स्पष्टीकरण : या ठेवी ठरावीक कालावधीसाठी ठेवल्या जातात. यातील रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढता येते. या  ठेवींवर दिला जाणारा व्याजदर तुलनेने अधिक असतो. वरील  उदाहरणात देखील एक वर्ष कालावधीसाठी एक रकमी रक्कम ठेवण्यात आली आहे.

२२)   अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला. 

    (मार्च २०२३)

उत्तर : संकल्पना : प्रत्यक्ष कर

स्पष्टीकरण : प्रत्यक्ष कर हा करदात्याच्या उत्पन्न व संपत्तीवर आकारला जातो. ज्या व्यक्तीवर हा कर लादला जातो त्याच व्यक्तीवर कराचा भार पडतो. हा कर दुसऱ्या व्यक्तीवर हस्तांतरित करता येत नाही. उदा. उत्पन्न व संपत्ती कर

२३)   राजूचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदत निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात.(मार्च २०२३, मार्च २०२४)

उत्तर : भांडवल बाजार

स्पष्टीकरण : भांडवल बाजार देशातील व देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधीची बाजारपेठ आहे. म्हणून वरील उदाहरणातून भांडवल बाजार ही संकल्पना स्पष्ट होते.

२४)   भारताने इराण कडून पेट्रोल खरेदी केले. (जुलै२०२३)

उत्तर : संकल्पना : आयात व्यापार

स्पष्टीकरण : एका देशाने दुसऱ्या देशाकडून वस्तू व सेवांची केलेली खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. वरील उदाहरणात देखील एका देशाने दुसऱ्या देशाकडून वस्तू खरेदी केलेली आहे.

२५)   महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला.(मार्च २०२४)

उत्तर : संकल्पना : अंतर्गत व्यापार

स्पष्टीकरण : राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी – विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय. वरील उदाहरणात देखील भारतातील एका राज्याकडून दुसऱ्या राज्यामध्ये व्यापार झाला आहे.

२६)   इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियात विकले.(मार्च २०२३)

उत्तर : संकल्पना : पुनर्निर्यात व्यापार

स्पष्टीकरण : वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून पुन्हा ती निर्यात केली जाते तेंव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतात. वरील उदाहरणात देखील इंग्लंडने आयात केली व त्यावर प्रक्रिया करून दुसऱ्या देशाला विक्री केले.

 


Share